Saturday, April 7, 2012

जुहूतील धनवंतांची झोपडीवासी असल्याची बतावणी उघड

जुहूतील धनवंतांची झोपडीवासी असल्याची बतावणी उघड

झोपडय़ांवर टाच आणण्यासाठी न्यायालयीन कारवाई सुरू
निशांत सरवणकर ,५ एप्रिल  / मुंबई

ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांची पत्नी झरीना, मुलगी फराह, टॉप्स सिक्युरिटीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या पत्नी सुनीता, मुलगा दिवाण, मुलगी रानिता तसेच ट्रिग सिक्युरिटीचे प्रमुख कॅप्टन सलारिया यांसह अनेक 'व्हीआयपी' झोपडीवासीय अखेर रस्त्यावर आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्रता निश्चित करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने घेतलेल्या सुनावणीच्या वेळी हे सर्वजण गैरहजर राहिल्यामुळे अखेर त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने याआधीच या सर्वाना फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी बनविले असून, झोपडय़ांवर टाच आणण्यासाठी न्यायालयीन कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी ७ जानेवारी २००६ रोजी 'लोकसत्ता'ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या प्रकरणी विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला आणि अखेरीस आर्थिक गुन्हे विभागामार्फत चौकशी सुरू झाली. या चौकशीत १३९ बनावट झोपडीवासीय असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये अनेक व्हीआयपी झोपडीवासीय असल्याचेही आढळून आले. या सर्वाना आरोपी बनवून झोपडय़ांवर टाच आणण्यासाठी पोलिसांनी २०१० मध्ये एस्प्लेनेड कोर्टातील १९व्या न्यायालयात अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. कारवाईचे बालंट आल्यानंतर या व्हीआयपी झोपडीवासीयांनी या प्रकल्पातून माघार घेण्यास सुरुवात केली. या झोपु योजनेत प्रचंड घोटाळा झाला असल्याचे सर्वप्रथम जुहू रेसिडेन्टस् वेल्फेअर असोसिएशनचे मच्छिंद्र करलकर यांनी निदर्शनास आणले. 
या प्रकरणी पोलिसांनी विकासक आलोक अग्रवाल व शैलेश चावला, वास्तुरचनाकार राजेंद्र पागनीस तसेच जुहू ताज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर सिद्धिक अब्दुल कादर शेख, सचिव दयानंद गर्जे तसेच संतोष साबळे या सहा जणांना अटक केली होती. हे सर्व जामिनावर असून, याशिवाय म्हाडा, पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल १२ अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांना अटक केली नसल्याचे दिसून येत आहे.      

असे घडले 'पात्र झोपडवासी' ठरण्याचे नाटय़ !
* जुहूतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एक एकरापेक्षा मोठा भूखंड म्हाडाकडून उद्यान व पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित 
* म्हाडाने आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भूखंडावर अतिक्रमण 
* सुरुवातीला फक्त ५७ झोपडय़ा. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पानंतर झोपडय़ांची संख्या १९३च्या घरात. १३३ जण म्हाडाच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून, तर उर्वरित ६० जण के-पश्चिम विभाग कार्यालयाकडून झोपडीवासी म्हणून पात्र घोषित. 
* जुहू ताज सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने झोपु प्रकल्पाची उभारणी. पात्र झोपडीवासींची संख्या वाढून २५७ च्या घरात. 
* संजय खान, राहुल नंदा, कॅप्टन सलारिया यांचे कुटुंबीय झोपडवासी म्हणून म्हाडाकडून पात्र.
* झोपुधारकांसाठी ११२ सदनिका असलेल्या दोन विंग आणि प्रत्यक्षात एकच व्यापारी गाळा असताना ३३ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम.

No comments: