Monday, April 2, 2012

सभ्य कर्नाटकू

सभ्य कर्नाटकू

आज - काल
रामचंद्र गुहा - रविवार, १ एप्रिल २०१२

ramchandraguha@yahoo.in
altराहुल द्रविड हा क्रिकेटमध्ये जसा निष्णात तसा वागण्या-बोलण्यातसुद्धा विनम्र, चतुर, मृदुभाषी आणि व्यवहारी आहे. 'प्रत्येकाने आपले काम व्यवस्थित करावे; इतरांच्या कामात दखल देऊ नये' या विचाराच्या द्रविडने माझा अनाहूत सल्ल्याचा 'बाऊन्सर' मनगटाचा वापर करीत 'लीलया' सीमापार टोलविला. परंतु माझा सल्ला अव्हेरताना, माझे मन दुखावणार नाही; याचीही त्याने काळजी घेतली होती..!

सुमारे वर्षभरापूर्वीची गोष्ट.. मी अस्थम्याच्या विकारातून नुकताच बरा झालो होतो. एक दिवस सकाळी एका वृत्तपत्रात पहिल्या पानावर एक उंच, कृश बांध्याचा, देखणा तरुण एका बुटक्या, मध्यमवयीन माणसाशी बोलत असतानाचे छायाचित्र दिसले. वरवर पाहता त्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील असमानता, भेदच नजरेत भरत असला; तरी छायाचित्राचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर वेगळी गोष्ट प्रतीत होत होती. 'त्या' तरुणाच्या चेहऱ्यावर समोरच्या व्यक्तीबाबत आदरभावना स्पष्ट दिसत होती. 'तो' तरुण जवळपास एक फूटभर खाली वाकून बोलत असला; तरी भावनिक पातळीवर विचार करता- तो वर, वर आणि वरच पाहत होता, असे म्हणावे लागेल.
कोण असावीत ही दोन माणसे? क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ! 'विशी'बद्दल (विश्वनाथ) मला बालपणापासूनच आकर्षण होते. त्याची तडाखेबंद फलंदाजी मी एके काळी पाहिलेली आहे. मी सर्वप्रथम कोणत्या क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले असेल, तर तो विश्वनाथ! माझ्या कर्नाटक राज्यातीलच हा क्रिकेटपटू अतिशय सभ्य, मृदुभाषी आणि सज्जन माणूस! मी ४० वर्षांपासून विश्वनाथचा चाहता (फॅन) आहे. आज कसोटी सामन्यांमध्ये विश्वनाथपेक्षा जवळपास दुप्पट धावा काढलेला क्रिकेटपटू त्याच्याबरोबर मला दिसत होता. एका पुलाखालच्या रस्त्याच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने विश्वनाथ आणि राहुल द्रविड एकत्र आले होते. काही दिवसांनी माझा दमाविकार पूर्णपणे बरा झाला. राहुल द्रविडशी माझा परिचय तसा वरवरचा, अल्प होता. घनिष्ट मैत्री नव्हती. तरीही मी त्याला पत्र लिहिले. त्यावर त्याने मला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते- ''मी लहान असताना रणजी करंडक सामन्यात हैदराबादविरुद्ध विश्वनाथ खेळत असताना सामना फार रंगतदार झाल्याचे मला आठवते. मी विश्वनाथचा खेळ पाहण्यासाठीच गेलो होतो. किमान २० हजार क्रिकेटप्रेमी सामना पाहण्यासाठी आले होते. आता गेले ते दिवस..''
अलीकडेच राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्या वेळी ग्रेग चॅपेलने त्याच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार वाचल्यानंतर मला द्रविड आणि विश्वनाथच्या त्या संयुक्त छायाचित्राची आठवण झाली. त्यापाठोपाठ २००६ मधील भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौराही आठवला. २० वर्षांत भारताने त्या वेळी उपखंडात मालिका जिंकली होती. तेव्हा राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या कामगिरीची प्रशंसा करताना ग्रेग चॅपेल म्हणाला होता- ''आजपर्यंत कोणत्याही क्रिकेट संघात दोन दृढनिश्चयी, संवेदनक्षम, संयमी आणि अभिमानी खेळाडू मला दिसले नाहीत. द्रविड आणि कुंबळे हे दोघे भारतीय संघाची शान आहेत. बंगलोरचे पाणी  निश्चितपणे वेगळे असले पाहिजे!''
..आणि खरोखरच कर्नाटकचे पाणी वेगळे आहेच. फलंदाज म्हणून द्रविडच्या आधी विश्वनाथ होता; तर गोलंदाज म्हणून कुंबळेच्या आधी भागवत चंद्रशेखरची कारकीर्द गाजली आहे. मी कट्टर कर्नाटकाभिमानी आहे हे सांगण्यात मला काही गैर वाटत नाही; उलट अभिमान वाटतो. कर्नाटकाच्या या चारही खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मला लाभले. आधी १९७०-७२ मध्ये विश्वनाथ आणि चंद्रशेखरचा; तर अलीकडच्या १५/२० वर्षांत कुंबळे आणि द्रविड यांचा! माझ्या मते सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मुंबईबाहेरील एकमेव उत्कृष्ट फलंदाज विश्वनाथच होता; तर चंद्रशेखर हा सवरेत्कृष्ट भारतीय फिरकी गोलंदाज (मनगटाच्या साहाय्याने फिरकी गोलंदाजी करणारा) होता; अपवाद फक्त सुभाष गुप्तेचा! भारताला अनेकदा विजय प्राप्त करून देणारे तसेच भारत पराभवाच्या छायेत असताना संयमित खेळ करून सामना वाचविणारे हे खेळाडू माझ्या मूळ गावातील आहेत. त्यांचा आदर, त्यांची प्रशंसा मी करतो ती केवळ त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे नव्हे; तर इतरही अनेक गुण त्यांच्या ठायी आहेत, म्हणून! विश्वनाथ आणि चंद्रशेखर हे त्यांच्या काळातील (४० वर्षांपूर्वीचा काळ) चांगले खेळाडू तर होतेच; शिवाय चांगले, सुस्वभावी, सज्जन, सहकाराची भावना असलेली माणसे म्हणूनही त्यांचा लौकिक होता; हे भारतीय संघातील तेव्हाचे त्यांचे सहकारीसुद्धा मान्य करतात. या दोघांप्रमाणेच नंतरच्या काळात मला द्रविड आणि कुंबळे यांच्याबद्दलही तितकेच आकर्षण वाटू लागले. या काळात सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता माझ्या दृष्टीने द्रविड हा उत्कृष्ट फलंदाज, तर कुंबळे अर्थातच सवरेत्कृष्ट भारतीय गोलंदाज होता. हे दोघेही कर्नाटकचेच सुपुत्र!
सुमारे दहा वर्षांपूर्वी मला एक परीक्षा द्यायची होती. परीक्षेच्या आदल्या रात्री मला एक स्वप्न पडले- अनिल कुंबळेचा एक लेगब्रेक चेंडू अ‍ॅलेक स्टिवर्टच्या बॅटच्या कोपऱ्याला चाटून गेला; आणि 'स्लीप'मध्ये राहुल द्रविडने तो झेल अचूक टिपला. हे स्वप्न म्हणजे माझ्या दृष्टीने शुभशकुन होता. या स्वप्नाने माझा आत्मविश्वास वाढला  आणि धिराने परीक्षा देऊन मी उत्तीर्ण झालो..!
विश्वनाथ, चंद्रशेखर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट क्षमतेबरोबरच त्यांच्यातील अन्य गुणांमुळेही त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो. अर्थात कौतुकाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये कालपरत्वे बदल झाला आहे. विश्वनाथ आणि चंद्रशेखर यांचे कौतुक करताना 'चार्मिग' (आल्हाददायक), 'डिसेंट' (छान), 'लेड बॅक'  (आता काळजीच नाही) असे शब्द ओठांवर यायचे; तर द्रविड आणि कुंबळे यांचे कौतुक करताना 'करेजिअस' (काय धीटपणा), 'कमिटेड' (निष्ठावंत) असे शब्द तोंडात येतात. ग्रेग चॅपेल यांनीही त्यांच्याबद्दल अशाच अर्थाचे शब्द वापरले आहेत. हा जो बदल आहे, तो बंगलोर शहराच्या बदलत्या मानसिकतेचे द्योतक आहे. विश्वनाथ आणि चंद्रशेखर यांच्या काळातील बंगलोर म्हणजे (आताचे नाव बंगळुरू) अतिक्रमण न झालेले क्युबन पार्क, सुंदर, नक्षीदार 'टाइल्स'ने सुशोभित असे बंगले, हिरवळ, सुंदर पक्षी, त्या वेळी बंगलोरमध्ये मोटारींपेक्षा चित्रपटगृहे अधिक होती. राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या काळात शहराचा चेहरामोहराच बदलला. नव्या काळात येथे हिरवळ नाही, पक्षी नाहीत, एप्सिलॉन, इन्फोसिस यांसारख्या बडय़ा उद्योगांचे शहर, काँक्रिटचे जंगल, बसगाडय़ा, मोटारी, मोटरसायकलींची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी असे हे बदललेले शहर!
विश्वनाथ आणि चंद्रशेखर यांनी क्रिकेटमध्ये प्रवेश केला; तेव्हा कर्नाटक राज्य नव्हते, म्हैसूर होते. सेंट्रल कॉलेजच्या मैदानावर क्रिकेटचे सामने व्हायचे. मैदानाभोवती झाडे होती. तात्पुरते उभारण्यात आलेले लाकडे स्टॅण्ड.. प्रेक्षकांसाठी! याउलट राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले; तेव्हा ६० हजार आसनक्षमतेचे चिन्नास्वामी स्टेडिअम (क्रीडा संकुल) प्रकाशझोतांनी (फ्लड लाइट्स्) युक्त असे हे भव्य स्टेडिअम आणि त्याच्या भोवती सशस्त्र सुरक्षारक्षकांची पलटण.. असा मोठा थाट!
क्लब आणि रणजी करंडक याबरोबरच दर एक वर्षांच्या अंतराने कसोटी सामने खेळणाऱ्या विश्वनाथला पुढे बिअरची आवड निर्माण झाली; तर चंद्रशेखर हा बऱ्याच वेळा शून्यावरच बाद व्हायचा. याउलट पदार्पणापासूनच राहुल द्रविडने खेळावरच लक्ष केंद्रित केले होते. वर्षभर जवळजवळ दररोज क्रिकेट खेळणे आणि कोणत्याही सामन्यात खेळताना जास्तीत जास्त झेल घेणे हे द्रविडने केले. आता निवृत्तीच्या वेळी सर्वानी त्याच्या वेगवेगळ्या सामन्यांतील कामगिरीची, फलंदाजीची मुक्तकंठाने प्रशंसा केली, तरी जास्तीत जास्त झेल घेण्याच्या त्याच्या विक्रमाची हवी तशी दखल घेतली गेली नाही. राहुल द्रविड हा विश्वनाथइतकाच; किंबहुना थोडा जास्तच चांगला म्हणावा लागेल. विश्वनाथ हा क्रिकेटच्या मैदानावरसुद्धा बसवनगुडी येथील कॉफी हाऊसप्रमाणेच वागायचा. म्हणजे कॉफी पिताना जो सहजपणा, अनौपचारिकता त्याच्यात असे, तशीच मैदानावरही त्याच्यात दिसायची. बदललेल्या आणि काहीशा कठीण काळात राहुल द्रविडला मात्र असे सहजपणे वागणे परवडणारे नव्हते. त्याला खेळातील विशेष कौशल्य, सातत्य, अष्टपैलूपणा अशा गोष्टी स्वत:मध्ये जाणीवपूर्वक निर्माण कराव्या लागल्या. काळानुसार ते आवश्यकही होते. कारण अलीकडच्या काळात क्रिकेटपटूंच्या चाहत्यांची संख्या तर वाढली आहेच; पण त्याचबरोबर क्रिकेटपटूंकडून त्यांच्या अपेक्षाही वाढू लागल्या आहेत. एके काळी क्रिकेट बोर्डावर अहंमन्य लोक असत, आज त्यांची जागा व्यावसायिक धूर्त, लबाड मंडळींनी घेतली आहे. बोर्डावर त्यांचे नियंत्रण आहे. याशिवाय व्यापारी प्रायोजक हाही एक मुद्दा आहे. या लोकांना खूश ठेवण्याचे कामसुद्धा यशस्वी, लोकप्रिय आधुनिक क्रिकेटपटूंना करावे लागते. एक नव्हे, अनेक दबाव त्यांच्यावर येतात. या अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी द्रविडला स्वत:ची अशी लोकप्रतिमा तयार करावी लागली. संयम, समतोल आणि स्व-नियंत्रण यासाठी अशा लोकप्रतिमेची गरज असते. क्रिकेटपटू हा विनयशील, आदरणीय असायला हवा; तसा द्रविड कायम विनयशील आणि आदरणीय राहिला. द्रविडच्या वर्तणुकीत एक प्रकारचा भारदस्तपणा होता, गांभीर्य होते. विश्वनाथच्या वागणुकीत एक प्रसन्नता होती. म्हणूनच दोघांना आपण अनुक्रमे 'सर्वात आदरणीय क्रिकेटपटू' आणि  'सर्वाधिक आवडता क्रिकेटपटू' म्हणून ओळखतो.
कदाचित विश्वनाथपेक्षा द्रविडच्या कण्यामध्ये अधिक कणखरपणा, अधिक बळ असेल, अर्थात काळानुरूप ते गरजेचेही आहेच. मी आणि राहुल द्रविड- आम्ही दोघेही विश्वनाथचे चाहते आहोत. द्रविडच्या काही गोष्टी विश्वनाथच्या व्यक्तिमत्त्वाशी साधम्र्य दर्शविणाऱ्या आहेत, तर काही नाहीत. जेव्हा जेव्हा द्रविडकडे कर्णधारपदाची जबाबदारी असे, तेव्हा तेव्हा तो 'स्लीप'ऐवजी 'मिड ऑफ'ला क्षेत्ररक्षणासाठी उभा असे, हे डझनवारी क्रिकेट सामने दूरचित्रवाणीवर पाहताना माझ्या लक्षात आले; तेव्हा मी त्याला पत्र लिहिले -
प्रिय राहुल,
'भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तू सवरेत्कृष्ट कसोटी फलंदाज आहेस, तसेच आजवरच्या भारतीय संघातील सर्वात चांगला 'स्लीप'मधील क्षेत्ररक्षकही आहेस. म्हणून तू 'स्लीप'मध्येच क्षेत्ररक्षण करावे, असे मला वाटते. इतर क्षेत्ररक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सोयीचे म्हणून तुला त्यांच्या जवळपास राहणे योग्य वाटत असेल याची आम्हाला कल्पना आहे; पण सर्वसाकल्याने विचार करता, तुझे क्षेत्ररक्षणाचे खरे स्थान 'स्लीप' हेच आहे. तू तेथेच असायला पाहिजे. 'स्लीप'मध्ये झेल घेण्याचे तुझे जे कसब आहे, ते अन्य कोणातही नाही. म्हणूनच सुरुवातीच्या षटकांमध्ये (ओव्हर्स) इतरांच्या हातून झेल सुटतात. तू 'स्लीप'मध्ये थांबलास, तर झेल सुटणार नाहीत.'
दोन-तीन दिवसांनी राहुलचे उत्तर आले; तथापि मी त्याला केलेल्या विनंतीचा, सूचनेचा उल्लेखही त्यात नव्हता. मी अलीकडेच लिहिलेले पुस्तक द्रविडने खरेदी केले होते आणि या पुस्तकाबद्दलच त्याने पत्रात सर्व लिहिले होते.
''तुमचे म्हणणे अगदी बरोबर आणि योग्य आहे. आपला (भारताचा) इतिहास गांधीजींपर्यंतच येऊन थांबतो. वास्तविक, गांधींनंतरही बरेच काही घडले. ६० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आपण आज कोठे आहोत याचाही विचार व्हायला पाहिजे. मी आपले पुस्तक अर्धे-अधिक वाचून संपविले आहे. १८० पाने वाचून पूर्ण झाली. या पुस्तकाबद्दल, तसेच इतर काही गोष्टींवर बोलणे मला आवडेल.'' असे द्रविडने उत्तरात म्हटले आहे.
मी पाठविलेला ई-मेल, त्यातील विनंती, सल्ला स्वागतार्ह नव्हता.. काही घडवून आणणारा, प्रेरणादायी नव्हता, किंबहुना गैरलागू होता आणि म्हणूनच धुडकावला गेला असावा असे मला वाटते. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास- मध्यमगती गोलंदाजाचा एक 'बाऊन्सर' चेंडू एका निष्णात फलंदाजाने मनगटाचा वापर करीत 'लीलया' सीमापार टोलविला होता.
'क्रिकेटमधील डावपेचांबाबत अनाहूत सल्ले देण्यापेक्षा इतिहासावरील पुस्तके लिहा; तुमचे काम तेच आहे' हेच जणू मला अतिशय सभ्य भाषेत, नाजूक आणि गोड शब्दांत सांगण्यात आले होते..!
अनुवाद : अनिल पं. कुळकर्णी

No comments: