Sunday, March 18, 2012

भक्ती तोलणारा 'देऊळ!'

भक्ती तोलणारा 'देऊळ!' 


श्रीकांत बोजेवार 

मराठी सिनेमा इज द मोस्ट हॅपनिंग सिनेमा इन इंडिया टुडे', असं सध्या म्हटलं जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल भारतीय चित्रपट वर्तुळात फार कौतुकाचं आणि कुतूहलाचं वातावरण आहे, त्याचाच हा पुरावा. गेली काही वर्षं सतत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा उल्लेख होतो आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी कलांवत, दिग्दर्शकांची नावं दिसत आहेत. आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे, एका बाजूला तद्दन धंदेवाईक मराठी चित्रपटांची निमिर्ती जुन्याच उत्साहाने सुरू असली, तरीही काहीतरी ठोस सांगू इच्छिणाऱ्यांची ,माध्यमाचा अभ्यास असणाऱ्यांचीही, एक फळी तयार झालेली आहे. या फळीचे प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याची खात्री पटवणारे काही चित्रपट गेल्या तीन-चार वर्षांत आलेले आहेत. 'देऊळ'च्या राष्ट्रीय पुरस्काराने त्या खात्रीला अधिक बळ दिलं आहे. 

उमेश कुलकणीर्च्या 'वळू'ने मराठी चित्रपटसृष्टीत, तिच्या परिचित प्रकृतीला आधुनिक काळाचं आंगडं-टोपडं घालणारा एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक-कलावंत आला असल्याची ग्वाही दिली होती. अस्सल ग्रामीण वातावरणनिमिर्ती, इरसाल व्यक्तिरेखा, विनोदाचा चलाख वापर हा एकेकाळी मराठी सिनेमाच्या यशाचा फॉर्म्युला होता. हिंदी सिनेमा ग्लॅमर, प्रेमकथा आणि संगीत यावर विसंबून होता. मराठीकडे त्या अस्त्रांची वानवा होती. अशा परिस्थितीत मराठीने आपली वेगळी व्यावसायिक गणितं शोधली होती. दीर्घकाळ तो पॅटर्न वापरल्यावर त्यामध्ये काळाच्या ओघात आवश्यक ते बदल होणं गरजेचं होतं; परंतु ते करण्याची प्रतिभा कुणात दिसत नव्हती. उमेशने ते करून दाखवलं. 'वळू' ही त्याची पहिली झलक होती; तर 'देऊळ' ही त्याचीच दुसरी पायरी आहे. सुदैवाने उमेशने मधल्या काळात 'विहीर'सारखा, संपूर्ण दृश्यभाषेत बोलणारा चित्रपट करून आपली रेंज दाखवून ठेवली आहे. अन्यथा 'देऊळ'कडे 'वळू'चा दुसरा भाग म्हणून पाहिलं गेलं असतं आणि उमेशवरही तसाच शिक्का बसला असता. 

अनेकांना 'वळू' आणि 'देऊळ'मधली वातावरणनिमिर्ती, रंगसंगती, व्यक्तिरेखाचित्रण आणि सादरीकरण यात सार्धम्य दिसतं. ते नाकारता येत नाही. परंतु या वातावरणनिमिर्तीचा 'वळू'मधील हेतू आणि 'देऊळ'मधील हेतू खूप वेगळा आहे. 'वळू'मध्ये दिग्दर्शकाला केवळ एक गमतीदार गोष्ट सांगायची होती; तर 'देऊळ'मध्ये त्याला 'भाष्य' करायचं आहे. हा फरक खूप मोठा आहे. 'वळू'मध्ये गोष्टच सांगायची असल्याने प्रेक्षकांना एक सौम्यसा धक्का देण्याची व्यावसायिक क्लृप्ती त्याने योजली होती. विनोदी अभिनयाचा अजिबात 'डाग' नसलेल्या अतुल कुलकणीर्ची प्रमुख व्यक्तिरेखेसाठी निवड केली. त्याचा योग्य तो फायदा आणि परिणामही झाला. 

देऊळ'मध्ये आशय महत्त्वाचा होता. त्यामुळे अभिनेता म्हणून ग्लॅमर नसलं तरी योग्यता आहे, अशा गिरीशची निवड त्याला करता आली. अशा प्रकारच्या चित्रपटाची प्राथमिक चर्चा व्हावी, त्याला प्रारंभिक प्रतिसाद मिळावा, याची व्यवस्था करण्यासाठी नाना पाटेकर, सोनाली कुलकणीर् यांची उपस्थिती मोलाची ठरली. हे दोन्ही कलावंत कसलेले आहेत आणि आपल्या व्यक्तिरेखा विश्वसनीय करतातच, हा बोनस ठरला. 'देऊळ'चा विषय अत्यंत नाजूक; कारण आपल्या धामिर्क भावना फार लवकर दुखावतात. आपल्या धामिर्कतेला विश्लेषणाचं, डोळसपणाचं वावडं आहे. अशा वेळी काही गंभीर सत्य सांगण्यासाठी विनोदासारखं माध्यम नाही. स्वयंभू मूतीर्, नवसाला पावणारा गणपती, जागृत देवस्थान हे शब्द आपण सहजपणे स्वीकारतो आणि वापरतो. त्यांचा उगम काय, प्रसार कोणी केला, प्रचीती किती लोकांना आली याची चिकित्सा करण्याच्या फंदात कोणी पडत नाही; पण उमेश पडला. त्याने अनेकांच्या मनातील शंका बोलून दाखवल्या. ज्या सत्याकडे, काही लोकांनी तयार केलेल्या अवडंबराकडे बोट दाखविण्याची अनेकांची इच्छा होती; उमेशने त्यावरच नेमकं बोट ठेवलं. 

देऊळ'च्या कथानकाच्या तपशिलात या ठिकाणी फार शिरता येणार नाही; परंतु त्यातील केशाची, अर्थात गिरीश कुलकणीर्ची व्यक्तिरेखा ही कळीची बाब आहे. केशा भाबडा आहे. साक्षात्काराची कथा तो रचत नाही. मुळात दत्ताचा साक्षात्कार त्याला होतो आणि त्या साक्षात्काराचा फायदा मग भलतेच लोक उठवतात. 

ज्या-ज्या लोकांना हा चित्रपट धामिर्क भावना दुखावणारा वाटला, त्यांना खरं तर दिग्दर्शकाने आधीच उत्तर देऊन ठेवलं आहे. चमत्कारावर विश्वास असलेली साधी सामान्य माणसं केवळ देवापुढे नतमस्तक होतात. त्यांच्या देवभोळेपणावर कोणतीही टीकात्मक कॉमेन्ट चित्रपटात नाही. टीका आहे, ती या श्रद्धेचा बाजार निर्माण करून त्यावर गुजराण करणाऱ्यांवर. यानिमित्ताने, प्रमुख विषयाशी काहीही संबंध नसलेले, परंतु नवी ग्रामीण संस्कृती सांगणारे प्रसंग, व्यक्तिरेखा चित्रपटात आल्या आहेत आणि ती उमेशची खरी ताकद आहे. 'वळू' काय किंवा 'देऊळ' काय; दोन्ही चित्रपटांत 'गाव' ही एक व्यक्तिरेखा आहे आणि अनेक छोटे छोटे परंतु मामिर्क प्रसंग मिळून हे गाव साकार होतं. केशाच्या तापाचा प्रसंग, सरपंच बाई आणि तिची सासू यांच्यातील प्रसंग, केशावर प्रेम करणाऱ्या तरुणीची भाषा, टीव्ही मालिकांचं वेड हे सर्व त्याचाच एक भाग आहे. टॅबू- म्हणजे सामाजिकदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विषयांवर लोकप्रिय शैलीत चित्रपट करताना हे सगळे घटक शॉक अॅब्झॉर्बर म्हणून काम करतात. त्यांचा अतिशय चांगला उपयोग दिग्दर्शकाने करून घेतला आहे. हा हेतू नेमका ओळखून लेखक आणि अभिनेता गिरीश कुलकणीर् यांनी आपल्या कामगिरीने परिणामात भर टाकली आहे. विनोदाखाली दडलेलं गांभीर्य समजून घेऊन परीक्षकांनी त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिला, याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अन्यथा, विनोदाकडे- तो गंभीर असला तरीही- गांभीर्याने पाहण्याबाबत आपली ख्याती नाही. त्यातही सर्वसामान्यंाना कळणाऱ्या विनोदाबाबत तर नाहीच नाही. 

राष्ट्रीय पुरस्कार देऊन योग्य तो गौरव झाला असला, तरीही देऊळबाबत काही खटकणाऱ्या बाबींचा उल्लेख केला पाहिजे. त्यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रेंगाळणारी कॉमेंट. जे सांगायचं ते सांगून झाल्यावरही चित्रपट रेंगाळतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी अकारण वाढली आहे. गावातील सर्व प्रवृत्ती नीट हाताळूनही भाऊ आणि अण्णा यांच्यातील संघर्षाचा धागा मध्येच लुप्त होतो. तो पुन्हा दिसतच नाही. केशाला त्याचेच एकेकाळचे सहकारी मंदिराच्या दारासमोर मारझोड करतात, ते पटत आणि पचतही नाही. अर्थात ही काही या चित्रपटाची समीक्षा नव्हे. राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने या चित्रपटाची योग्यता पुन्हा एकदा सांगण्याचा हा प्रयत्न आहे. 

मराठी चित्रपटांबद्दल अमराठी लोकंामध्ये निर्माण झालेली उत्सुकता वाढवण्याचं काम पुरस्कारांनी केलं आहे. एकेकाळी राष्ट्रीय पुरस्कार आणि व्यावसायिक अपयश हातात हात घालून चालत असत. त्या काळातील अनेक उत्तम चित्रपट, पुरस्काराबाबतच्या गैरसमजाचा बळी ठरलेले आहेत. ते वर्तुळ भेदून आता व्यवसाय आणि गौरव यांची सांगड घातली जात आहे, हा बदल स्वागतार्ह आहे. 'होलसम एंटरटेन्मेन्ट'साठी वेगळा पुरस्कार देऊन, मुख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट हे मनोरंजनापासून दूर असतात, हा समज घट्ट केला जात होता. हा गैरसमज दूर करण्यात मराठी चित्रपटाने महत्त्वाची भूमिका बजावावी, हे सुखावणारं आहे.  

No comments: