Saturday, April 7, 2012

चमत्कारी आणि शक्तिशाली एकशिंगी गेंडय़ासाठी धोक्याची घंटा

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=220107:2012-04-06-19-25-48&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

औषधी घटकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारी किंमत ठरतेय जीवघेणी
* आफ्रिकेत वर्षभरात १६० गेंडय़ांची शिकार  * काझीरंगावरही शिकारी टोळ्यांची नजर
विक्रम हरकरे , मुंबई
altपृथ्वीतलावरील सर्वात चमत्कारी आणि प्रचंड शक्तिशाली अशा महाकाय वन्यजीवांपैकी एक असलेल्या एकशिंगी गेंडय़ाची जगभरातील जंगलांत सर्वाधिक शिकार केली जात आहे. गेंडय़ाच्या शिंगातील औषधी घटकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारी अफाट किंमत त्याच्या जीवावर उठली आहे. वाघाच्या संरक्षणासाठी जगभरातील सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिक प्रयत्न सुरू केल्याने अडचणीत आलेल्या शिकारी टोळ्यांनी आता एकशिंगी गेंडय़ाला लक्ष्य बनवले आहे. गेल्या वर्षभरात जगातील ३०० पेक्षा अधिक एकशिंगी गेंडय़ांची शिकार करण्यात आली, अशी धक्कादायक आकडेवारी दक्षिण आफ्रिकेतील एका खाजगी स्वयंसेवी वन्यजीव संस्थेने प्रकाशित केली आहे. यापैकी १६० गेंडय़ांना एकटय़ा दक्षिण आफ्रिकेत ठार करण्यात आले. जगभर वाघांच्या संवर्धनाची मोहीम राबविली जात असताना गेंडय़ांच्या शिकारीकडे मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने हा महाकाय प्राणी काही वर्षांनी नामशेषाची वाट चालू लागेल, असे गृहितक वर्तविण्यात आले आहे.
भारतात आसामातील काझीरंगा, पबितोरा आणि पश्चिम बंगालमधील गोरूमारा अभयारण्यात एकशिंगी गेंडय़ाच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याचे अलीकडच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. गेल्या तीन महिन्यात काझीरंगातील पाच गेंडय़ांची शिकार झाल्याचे सांगण्यात आले असले तरी ही संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, एकशिंगी गेंडय़ाचे शिंग काढून घेण्याची पद्धती शास्त्रशुद्ध नसल्याने गेंडय़ांचा मृत्यू ओढवत असल्याचे गेल्या महिन्यात उघडकीस आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत परवानगी घेतल्यानंतर या गेंडय़ाचे शिंग काढून घेतले. परंतु, ही पद्धती वैद्यकीय दृष्टय़ा अत्यंत चुकीची होती. जखमांनी विव्हळणारा गेंडा जंगलाबाहेर पडला आणि गावाच्या सीमेवर पोहोचला. गावकऱ्यांनी त्याला दगड-धोंडय़ांनी जबर जखमी केले. परिणामी अंतर्गत रक्तस्रावाने हा गेंडा नंतर मृत्युमुखी पडला, असेही नंतर उघड झाले. ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यानजीकच्या लखीमपूर-मंजुली सीमेवरील ही घटना २५ मार्चला उघड झाली. 
या घटनेला मिळालेले दुसरे वळण म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या दहशतवादी (उल्फा) संघटनेने या घटनेवर तीव्र आक्षेप घेऊन नव्या संघर्षांचे संकेत दिले आहेत. गेंडय़ांचे शिंग काढून घेण्याची शास्त्रीय पद्धती जाहीर करावी आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने गेंडय़ाचे शिंग काढावे, अन्यथा एकशिंगी गेंडय़ांची 'सरकारी पद्धतीने हत्या' करण्याच्या घटना वाढतील, असा इशारा उल्फाने दिल्यामुळे आसाम सरकारला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे गेंडय़ांचे शिंग काढून घेणे आणि त्याची जपणूक यासाठी पारदर्शी पद्धती अवलंबिली जाणार असून या शिंगाच्या विक्रीपासून मिळणारा महसूल गेंडय़ांच्या संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. आशियाई बाजारपेठेतही गेंडय़ाचे शिंग औषधी गुणांसाठी प्रचंड किंमत देऊन खरेदी केले जाते. शिंगातील औषधी गुणांमुळे कोणतीही जखम लवकर भरून येते. त्यामुळे शिंगासाठी गेंडय़ांची हत्या केली जाते. काझीरंगातील गेंडय़ांची शिकार रोखण्यासाठी आसाम सरकारने अभयारण्यात १५२ फॉरेस्ट कॅम्प उभारले असून एका कॅम्पमध्ये सहा सशस्त्र वनरक्षक ठेवले आहेत. काझीरंगातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर गस्त घालण्याठी इंजिन बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. 
काझीरंगातील गेंडय़ांच्या मागावर असलेली एक टोळी अलीकडेच जोरहाट जिल्हा पोलिसांच्या हाती गवसली. दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांच्यापाशी अत्याधुनिक स्वयंचलित बंदूक आणि मोठय़ा प्रमाणात काडतुसे सापडली. या दोघांचा आंतरराष्ट्रीय शिकारी टोळ्यांशी संपर्क आहे. नागालँडमधून गेंडय़ांच्या शिंगाची तस्करी केली जात असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. गेल्या काही महिन्यात काझीरंगात पाच गेंडय़ांची शिकार केल्यानंतर त्यांची शिंगे कापून मृतदेह तसेच फेकून दिलेले आढळले. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात ७ आणि ८ एप्रिलला गेंडय़ांची गणना होत असून त्यानंतर एकूण आकडेवारी जाहीर केली जाईल. तीनशे वन कर्मचारी आणि तज्ज्ञांना गणनेचे काम सोपवण्यात आले आहे. दर चार वर्षांनी गेंडय़ांची गणना केली जाते. गेंडय़ांच्या गणनेसाठी तीन दिवसांकरिता हे अभयारण्य बंद करण्यात आले आहे. २००९ सालच्या आकडेवारीत २०४८ गेंडे काझीरंगात अस्तित्वात होते. आसाम आणि दक्षिण आफ्रिकेतील गेंडे शिकारी टोळ्यांचे पहिले लक्ष्य असते. दक्षिण आफ्रिका गेंडय़ांची शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. दक्षिण आफ्रिकेतील 'हाय प्रोफाईल कॉलगर्ल्स'चा गेंडय़ाच्या शिंगांसाठी गिऱ्हाईके शोधण्यात वापर करून घेतला जात आहे, असे जोहान्सबर्ग येथे एका र्था नागरिकाच्या अटकेने स्पष्ट झाले. ही नवी लाट भारतातील गेंडय़ांच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल. 

No comments: