Saturday, April 7, 2012

बुक-अप : महामंदीची तेजतर्रार कथा..

बुक-अप : महामंदीची तेजतर्रार कथा..


गिरीश कुबेर  ,शनिवार, ७ एप्रिल २०१२
girish.kuber@expressindia.com
altaltलियाकत खान पाकिस्तानचे. अमेरिकेत असतात. बँकर आहेत. अगदी जागतिक बँकेपासून खासगी बँका, गुंतवणूक संस्था वगैरेत तीसपेक्षा अधिक वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. २००८ मध्ये आर्थिक मंदीच्या काळात जगाला सावरण्यासाठी काय काय करावं लागेल याच्या उपायांची चर्चा सुरू असताना अहमद या अर्थकरुण नाटय़ात प्रत्यक्ष सहभागी होते..

१९३० च्या महामंदीतून चार बँकरांनी जगाला कसं बाहेर काढलं याची कथा त्यांनी अशी मांडली आहे की, मंदीबद्दल काही बोलण्याआधी हे तेजतर्रार पुस्तक वाचणं अनिवार्य ठरावं!

एप्रिलचा पहिला आठवडा सर्वसाधारणपणे पैशाच्या चर्चेचा असतो. नवं आर्थिक वर्ष सुरू झालेलं असतं. सरत्या आर्थिक वर्षांच्या जखमा बँक खात्यात किंवा विवरणपत्रात विखुरलेल्या असतात. त्या जखमांतून झालेला अर्थपात कशातून भरून काढता येणार आणि खिशाला केलेले व्रण कधी भरणार.. हा प्रश्न सगळय़ांना सतावत असतो. यात व्यक्तीही आल्या आणि संस्था, कंपन्या आणि अगदी सरकारंही आली. पैशाची चिंता कोणाला चुकलीये.
त्यात यंदाचं वर्ष तर अगदीच कटकटीचं गेलं. सगळय़ा जगासाठीच. युरोपचं हल्लीहल्लीच बांधलं गेलेलं कुटुंब एकत्र नांदतंय, की विभक्त होऊन वाटण्या करायला लागणार? परत हे घर तुटलं तर वाटण्या कशा आणि किती करायच्या ही चिंता. इकडे प. आशियातल्या वाळवंटातली खदखद काही शांत व्हायला तयार नाही. त्यामुळे तेलाच्या भावाची उकळी सुरूच आहे, त्याची काळजी. अमेरिकेत, फ्रान्समध्ये निवडणुका आहेत. त्यामुळेही वेगळीच अस्वस्थता. या सगळय़ाचा परिणाम हा खर्चाशी निगडित असतो. त्यामुळे गेल्या अर्थवर्षांत आपलीच नव्हे सगळय़ा जगाचीच अर्थव्यवस्था गटांगळय़ा खात होती. त्यात आपलं दु:ख तर अधिकच कडवं. नवराबायको दोघेही डॉक्टर असणाऱ्या घरातच सारखी आजारपणं निघावीत तसं अर्थतज्ज्ञ पंतप्रधान असताना आपल्याकडे होतंय. या पाश्र्वभूमीवर आता २००८ सालच्या मंदीप्रमाणेच अर्थव्यवस्था सुस्त होणार का, वगैरे प्रश्न सुजाणांना पडायला लागलेत. चांगलंच आहे ते.
पण ही परिस्थिती काही पहिल्यांदाच निर्माण होतीये असं नाही. अशी परिस्थिती आली की सगळय़ांना एकदम आठवण होते ती १९३० सालच्या महामंदीची. ती खरी पहिली मंदी. पहिल्या महायुद्धाचे आर्थिक आणि शारीरिक घाव पुरते शमले जायच्या आत हा मंदीचा फेरा आला. त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचा भांडवली बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्या धक्क्यानं जगभरातल्या अर्थव्यवस्था मटकन बसल्या. ते सगळं समजून घेणं फारच बहारदार आहे. पण त्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञ वगैरे म्हणवून घेणाऱ्या प्राध्यापकी तज्ज्ञास सांगितलं तर आपल्याकडे तो असं काही घुमवायला लागतो की याच्याकडून समजून घेण्यापेक्षा मंदी परवडली, असं वाटू लागतं. कारण कोणताही विषय सोपा करून सांगायचा म्हटलं की आपल्याकडच्या तज्ज्ञांना वगैरे थेट कमीपणाच वाटतो.
या सगळय़ांनी लियाकत खान यांचं लॉर्ड्स ऑफ फायनान्स हे पुस्तक एखादा धर्मग्रंथ वाचत आहोत, असं समजून वाचायलाच हवं. लियाकत खान पाकिस्तानचे. अमेरिकेत असतात. बँकर आहेत. अगदी जागतिक बँकेपासून खासगी बँका, गुंतवणूक संस्था वगैरेत तीसपेक्षा अधिक वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. या क्षेत्रातल्या मंडळींचा कागदाशी संबंध सहसा फक्त नोटांच्या माध्यमातूनच येतो. त्या अर्थाने हे सर्वच अक्षरशत्रू. वाङ्मय म्हणजे काय असतं..असा प्रश्न त्यांना पडत असतो इतके ते कंटाळवाणे असतात. परंतु लियाकत अहमद हे हेवा वाटावा असे या सगळय़ाबाबत अपवाद आहेत. आर्थिक मंदीच्या काळात जगाला सावरण्यासाठी काय काय करावं लागेल याच्या उपायांची चर्चा सुरू असताना अहमदसाब या सगळय़ा अर्थकरुण नाटय़ात प्रत्यक्ष सहभागी होते. १९९९ साली त्यावेळी अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे.. म्हणजे त्या देशाच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांनी एक सूचना केली होती. की अमेरिकेचे अर्थमंत्रीसदृश रॉबर्ट रुबिन आणि जगातल्या अन्य देशांच्या अर्थखात्याच्या धुरिणांनी एक समिती स्थापन करावी, एकमेकांशी सतत सल्लामसलत करावी आणि त्यांनी या कठीण काळातून अर्थनैय्या पार करावी. ती सूचना अहमद यांनी वाचली आणि त्यांना आठवलं पहिल्या महायुद्धाच्या काळात जगातल्या चार अर्थमहासत्तांच्या रिझव्‍‌र्ह बँकांचे प्रमुख असेच एकमेकांच्या संपर्कात होते. इंटरनेट नाही, मोबाइल तर सोडाच.पण लवकरात लवकर संपर्क साधायचा मार्ग म्हणजे तार.साधे फोनही धड नाहीत.अशा काळात हे चार दिशेला असणाऱ्या चार महासत्तांच्या तिजोऱ्यांचे प्रमुख एकमेकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात होते. त्यांच्यात कमालीचं सौहार्द होतं आणि एकमेकांच्या अर्थकथा समजून घेण्यात एकमेकांना सहानुभूती होती.
तर अमेरिकेचे बेंजामिन स्ट्राँग, बँक ऑफ इंग्लंडचे माँटेग्यु नॉर्मन, बँक द फ्रान्सचे एमिल मॉऱ्यू आणि जर्मनीच्या राईश बँकेचे हाल्मर श्माष्ट यांच्या संर्घषाची ही कहाणी आहे. कमालीच्या रोचकपणे मांडलेली. त्यांच्या वैयक्तिक लकबी, स्वभाव त्यातून निर्माण झालेले ताणतणाव.त्यांची आजारपणं.अशा सगळय़ा मानवी कथांचा आधार घेत लॉर्डस ऑफ फायनान्स आपल्याला पुढे पुढे खेचत नेतं. अहमद लौकिकार्थाने अजिबात लेखक नाहीत. मला वाटतं 'लॉर्ड्स.. ' नंतर त्यांनी काही लिहिलेलं नसावं. भल्याभल्यांची छाती दडपून टाकेल अशा आर्थिक संघर्षांची गोष्ट आपल्याला सांगायची आहे..या एकमेव आंतरिक ओढीनं त्यांनी हे सर्व लिखाण केलंय. १९१८ ते १९३० पर्यंतच्या काळाचा हा अर्थपट. त्या काळात अमेरिकेवर महासत्ता म्हणून राज्याभिषेक व्हायचा होता. तेव्हाची खरी महासत्ता म्हणजे इंग्लंडच. सांस्कृतिक कारणांनी ही बाब जर्मनीला मान्य असणं शक्यच नव्हतं. खेरीज पहिल्या महायुद्धाचं बिलही जर्मनीच्या नावावर फाडलं गेलं होतंच. त्यात पुन्हा फ्रेंचाच्या नजरेतंनंही ब्रिटिशर्स कमअस्सल. तोही कंगोरा या संबंधांना. अशा वेळी विक्षिप्त नॉर्मन आणि कडवे श्माष्ट यांच्यातली देवाणघेवाण ज्या पद्धतीनं अहमद यांनी मांडली आहे, त्याचं कौतुकच वाटतं. नॉर्मन मध्येच गायब व्हायचे. प्रसिद्धीचा त्यांना कमालीचा राग. त्यात हे अर्थसंकट हाताळायचं. सांगायला आवडत नाही म्हणून ते दाबून ठेवायचं तरी किती, हा प्रश्न. तेव्हा हा माणूस आजारपणाचं कारण सांगत गायब होतो आणि थेट अमेरिकेत पोहोचतो. परत या प्रश्नाच्या हाताळपणातही मतैक्य नाही. नॉर्मन यांचा आग्रहही देशोदेशींच्या अर्थव्यवस्था सुवर्णनिकषाशी जोडण्याचा. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर एखाद्या देशात जेवढय़ा किमतीचा सोनेसाठा असेल तेवढय़ाच किमतीचं चलन त्या देशानं बाजारात आणावं, असा त्यांचा आग्रह. त्यामुळे हे सुवर्णनिकष पाळण्यासाठी व्याजदर एकतर्फी कमी-जास्त करणं आदी उपाय ते बिनधास्त योजतात. हे इतरांना मान्य असतंच असं नाही. त्यातून जे काही होतं आणि तरीही हे चार बँकर जगाला वाचवतात. त्याचं सोपंसुलभ वर्णन यात आहे.
शिवाय आणखी एक बाब या पुस्तकातून सहजपणे समोर येते. ती म्हणजे कोणीही कितीही उच्च दर्जाचा अर्थतज्ज्ञ वगैरे असला तरी त्याला आगामी आर्थिक संकटांची चाहूल बिनचूकपणे लागू शकत नाही. त्यामुळेच घडून गेलेल्या घटनांचं भाकीत अर्थतज्ज्ञ उत्तम वर्तवतात..अशी टीका होत असावी. अर्थतज्ज्ञाच्या यशाचं मोजमाप करायचं असतं ते कठीण आर्थिक काळात त्याने मार्ग काय सुचवले, त्यावरून. हे लक्षात घेतलं की हे चारही बँकर थोर का होते आणि आताचे तज्ज्ञ म्हणवून घेणारे कुठे कमी पडले.हे सहज कळतं. या पुस्तकाचं हे आणखी एक यश.
स्वत: एका बहुराष्ट्रीय वित्तसंस्थेत उच्चपदावर असणाऱ्या एका मित्रानं आपल्याकडे बोलघेवडय़ांच्या अर्थचर्चा रंगत होत्या तेव्हा हे पुस्तक मला दिलं. वर सल्लाही. हे सगळं मुळापासून समजून घ्यायचं असेल तर टीव्हीवर जे काही दिसतंय, ते अजिबात बघू नकोस. आधी हे पुस्तक वाच आणि मगच त्या टीव्हीचर्चा वगैरे बघ.. थोडक्यात त्याच्या सल्ल्याचा सूर असा होता की फोडणीची पोळी कशी करायची याचं मार्गदर्शन घेण्याआधी मुळात पोळी कशी करतात, ते समजून घे. 
तो सल्ला तंतोतंत मानावा असाच होता. हे पुस्तक वाचलं आणि अहमद यांच्याविषयी आदरच आदर वाटू लागला. आर्थिक मंदीसारखा मुळातच मंद विषय इतक्या रसाळपणे मांडता येतो हे कळणं हेच आनंददायी आहे. परत आपण बँकर आहोत याचा कोणताही कसलाही शहाणपणा अहमद यांच्या लिखाणात नाही. आणि मुख्य म्हणजे आपण काही समजून वगैरे सांगायला जातोय.. असं म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही. जे काही घडलं.. त्याची गोष्ट. ती इतकी चांगली सांगितली गेली आहे की पुलित्झरसकट डझनांनी पुरस्कार न मिळते तरच नवल. मला त्या पुरस्कार देणाऱ्यांचंही कौतुक वाटतं. आपल्याकडे साहित्य पुरस्कार म्हणजे कथा-कादंबरी-कविता. मग ते कितीही भुक्कड का असेना. यांनाच द्यायचे असा समज आहे. माहिती देणारं वाङ्मय हे जणू साहित्यच नाही. असंच आपण वागतो. असो. मुद्दा अर्थातच तो नाही.  या पुस्तकाच्या गौरवाचा आहे आणि तो अधिक महत्त्वाचा आहे. पुढे या पुरस्कारांच्याही पेक्षा एक प्रचंड मोठं प्रमाणपत्र या पुस्तकाला मिळालं.
झालं असं की २००८ साली जगाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकली. त्या आधी अमेरिकेत गृहकर्जाचा कृत्रिमरीत्या फुगवलेला फुगा जोरदार आवाज करीत फुटला होता. त्याच्या आवाजाचा दणका इतका होता की तो ऐकूनअमेरिकेतच अनेक बँकांची ह्रदयक्रिया बंद पडली आणि त्यांनी राम म्हटला. तर अमेरिकी पद्धतीप्रमाणे नंतर या सगळय़ात कोणाचं काय चुकलं याची चौकशी करण्यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींची समिती वगैरे नेमली गेली. या समितीनं अनेक बँकांचे प्रमुख आदींना पाचारण केलं. त्या सगळय़ांचं झाल्यावर फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख बेन बर्नाके यांनाही निवेदन देण्यासाठी बोलावून घेतलं. सगळं कामकाज झालं असावं. नंतर सहज चहापाणी सुरू असताना बर्नाके यांना विचारलं गेलं. हा सगळा इतका आर्थिक गुंतागुंतीचा विषय समजून घ्यायचा असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, इच्छुकांसाठी कोणत्या पुस्तकाची शिफारस कराल.
ते म्हणाले, एकच 'लॉर्ड्स ऑफ फायनान्स'.
एखाद्या पुस्तकासाठी यापेक्षा अधिक मोठा गौरव-पुरस्कार तो कोणता!

No comments: