Monday, March 19, 2012

महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या का ? - मोदी

महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या का ? - मोदी

प्रतिनिधी, पुणे, सोमवार, १९ मार्च २०१२
altगेली अनेक वर्षे पंतप्रधानांची 'भूमिका' उत्कृष्टपणे साकारल्याबद्दल मनमोहनसिंह यांना 'ऑस्कर' पुरस्कार मिळाला, अशा आशयाचा 'एसएमएस' आपल्याला आल्याचे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांची यथेच्छ खिल्ली उडवली.

देशाला पंतप्रधान आहे की नाही, असे आजचे चित्र असून देश कोणत्या दिशेला चाललाय तेच कळत नाही, अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. अन्य राज्यांतील शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातच असे का होते, असा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही टीका केली. त्यांच्या बाबतीत जनताच योग्य वेळी बोलेल, असेही त्यांनी सांगितले
पुणे गुजराथी बंधू समाज संस्थेने १०० व्या वर्षांत पदार्पण केले, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदींना 'गुजरातरत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गणेश कला क्रीडा मंच येथे गुजराथी बांधवाच्या भरगच्च उपस्थितीत झालेल्या भव्य समारंभात ते बोलत होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया, संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष चंदूलाल शहा, जिग्नेश शहा, भरतभाई शहा, हरीभाई शहा, नैनेशभाई नंदू आदी उपस्थित होते. मोदींनी गुजरातचा मागील दहा वर्षांतील प्रवास मांडताना विविध क्षेत्रातील भरीव प्रगतीची आकडेवारी सादर केली. 
मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात. कापसाचे उत्पादन आंध्र आणि गुजरातमध्ये देखील होते. मात्र, तेथील शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. मग, महाराष्ट्रातच असे का होते. कापसाला विदेशात खूप मागणी असताना कापूस निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जवळपास १५ हजार कोटींचे नुकसान करणाऱ्या केंद्र सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.   केंद्र सरकारला शेतीवर किंवा शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार उरला नाही. असे वागून केंद्राने देशाची विश्वासार्हता शून्य करण्याचे काम केले. असा आरोप नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना केला.

No comments: