Sunday, March 18, 2012

आठवलेंच्या नाराजीमुळे महायुती संकटात

आठवलेंच्या नाराजीमुळे महायुती संकटात 


सेनेने देऊ केलेली पदे नाकारली
खास प्रतिनिधी ,मुंबई

altशिवसेनेपाठोपाठ भाजपाकडूनही राज्यसभेसाठी डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या रिपाई नेते रामदास आठवले यांनी आता मुंबई महापालिकेत शिवसेनेने देऊ केलेली कोणतीही पदे न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाच महापालिकांच्या निवडणुकाही स्वबळावर लढविण्याचा निर्धार आठवले गटाने केल्यामुळे राज्यातील महायुती संकटात आली आहे.शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची राज्यसभेची रिक्त होणारी एक जागा आपल्याला मिळावी, अशी आठवले यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. दोनच दिवसांपूर्वी आरपीआयच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आठवले यांना खासदारकी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठोस असे काही आश्वासन दिले नव्हते व त्यांची मागणीही धुडकावली नव्हती. परंतु दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने अनिल देसाई यांची उमेदवारी निश्चित केली. त्यानुसार शुक्रवारी देसाई यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला, त्यामुळे आठवले यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. त्यामुळे शिवसेनेवर प्रचंड नाराज झालेल्या आठवले यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून शिवसेना नाही तर भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी धडपड सुरु सुरू केली होती. भाजपचीही एकच जागा आहे. ही जागा मिळावी यासाठी आठवले भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले असतांना रिपब्लिकन नेत्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची विधान भवनात भेट घेतली व आठवलेंच्या खासदारकीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. त्याचवेळी या नेत्यांनी दूरध्वनीवरुन नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून आठवलेंना राज्यसभेवर निवडून देण्याची विनंती केली. मात्र दिल्लीतही भाजपाकडून त्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या आठवले यांनी शिवसेनेकडून मुंबईतील देऊ केलेल्या प्रभाग समित्यांचे सदस्यत्व स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आरपीआयला देण्यात येणारी वृक्ष प्राधिकरण समितीही घ्यायची नाही, असे ठरविले आहे. 
अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड व प्रितमकुमार शेगावकर या रिपब्लिकन नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन पार्टीची भूमिका स्पष्ट केली. तसेच शिवसेनेने शनिवारी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावरही बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यामुळे एकंदरीतच खासदारकीच्या मुद्यावरुन आरपीआय सेनेपासून दूर चालल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आगामी १५ एप्रिल रोजी होणाऱ्या पाच महापालिकांच्या निवडणुकाही स्वबळावर लढविण्याचा विचार आठवले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केला असल्यामुळे महायुती संकटात आली आहे.     

No comments: