Monday, March 19, 2012

वित्त-नावीन्य : पीपीएफ एक फायदेशीर गुंतवणूक

वित्त-नावीन्य : पीपीएफ एक फायदेशीर गुंतवणूक

प्रा. डॉ. रवींद्र सोनटक्के, सोमवार, १९ मार्च २०१२
ravi_stax@rediffmail.com
सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ) ही राष्ट्रीय बचत संघटनेतील अति फायदेशीर गुंतवणुकीची, बचतीची योजना आहे. कोणत्याही उत्पन्न गटातील, स्वयंरोजगारातील अथवा निवृत्तिवेतन घेणाऱ्या व्यक्तींना तसेच आयकरदात्यांनी बचतीच्या व सवलतीच्या दृष्टीने राष्ट्रीय बचत योजनांमधील एक महत्त्वाची योजना म्हणून भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केली आणि आजही ही योजना इतर गुंतवणुकीच्या योजनांमध्ये अग्रणी आहे.सार्वजनिक भविष्य निधी खाते कोणतीही प्रौढ व्यक्ती स्वत: किंवा अज्ञान मुलांकरिता उघडू शकतो. पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडण्याची सवलत आहे, तसेच जी व्यक्ती सामान्य भविष्य निधी (GPF) किंवा कर्मचारी भविष्य निधी (EPF) चा सदस्य आहे, त्यांनासुद्धा पीपीएफचे खाते उघडता येते. सार्वजनिक भविष्य निधी खाते शहरातील डाक कार्यालयात किंवा भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा इतर मुख्य राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडता येते.
*  अंशदान आणि त्याची मर्यादा : पीपीएफ ही १५ वर्षीय अशी योजना आहे की, ज्यात कमीत कमी १६ अंशदान आवश्यक आहेत. या अंशदानाचा दरसुद्धा सोयीस्कर आहे. प्रत्येक वित्तीय वर्षांत कमीत कमी ५०० रु. ते जास्तीत जास्त १,००,०००/- रु.पर्यंत रक्कम जमा करता येते. यामधील रुपये ५ च्या पटीत असलेली कितीही रक्कम भरता येते. द. म. रक्कम भरलीच पाहिजे असे नाही, तसेच दरवर्षी भरलेली रक्कम समानच असणेही आवश्यक नाही. थोडक्यात खातेदार त्याच्या सोयीनुसार रकमा भरू शकतो. मात्र एका वर्षांत जास्तीत जास्त १२ वेळा रक्कम भरता येते, फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे की, अंशदानाची रक्कम प्रत्येक वित्तीय वर्षांत ५०० रुपयांपेक्षा कमी नसावी. रक्कम (अंशदान) चेक, डिमांड ड्राफ्टद्वारे केले असल्यास चेक जमा केल्याची तारीख हीच रक्कम भरल्याची तारीख समजण्यात येते.
*  व्याज : या खात्यात जमा रकमेवर केंद्र सरकारद्वारे निर्धारित दराने व्याज देण्यात येते. सध्या व्याजाचा दर ८.६० टक्के आहे. व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवसापासून त्याच महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करण्यात येते. अर्थात अंशदान पहिल्या पाच दिवसांत करावे म्हणजे पूर्ण व्याज मिळते. इतर दिवशी जमा केले तर त्या रकमेवर त्या महिन्यात व्याज मिळत नाही.
*  पैसे काढण्याची सोय : सहा पूर्ण वित्तीय वर्षांनंतर म्हणजेच ७ व्या वर्षांपासून या खात्यातून दरवर्षी फक्त एकदा असे ७ व्या वर्षांपासून ते १६ व्या वर्षांपर्यंत पैसे काढता येतात. ही काढली जाणारी रक्कम (समजा ७ व्या वर्षी काढली तर) त्या वर्षांमागील चौथ्या वित्तीय वर्षांत असलेली शिल्लक किंवा मागील सहाव्या वर्षांची शिल्लक रक्कम यातील जी कमी असेल तिच्या ५० टक्के असू शकते.
* प्राप्तिकर सवलत : प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम ८० सीअंतर्गत सार्वजनिक भविष्य निधी खात्यात संबंधित वित्तीय वर्षांत भरलेली रक्कम १,००,०००/- रुपयांपर्यंत एकूण उत्पन्नातून कपातमान्य आहे. आवश्यकतेप्रमाणे कमी-जास्त रक्कम दरवर्षी या खात्यात जमा करण्याची सोय या योजनेमध्ये असल्यामुळे ३१ मार्चपूर्वी देय कराचा विचार करून रक्कम जमा करता येऊ शकते.
*  कर्जाची सोय : सार्वजनिक भविष्य निधी योजनेत खाते उघडलेल्या वित्तीय वर्षांपासून तीन वित्तीय वर्षांनंतर कर्ज मिळण्याची सोय आहे. ही कर्जाची रक्कम पहिल्या वित्तीय वर्षांच्या शेवटी शिल्लक असलेल्या रकमेच्या २५ टक्के राहील. या सोयीचा उपयोग फक्त पहिली पाच वित्तीय वर्षे पूर्ण होईपर्यंतच राहील, कारण त्यानंतर पैसे काढण्याची सोय उपलब्ध होते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा जास्तीत जास्त ३६ हप्त्यांमध्ये करता येते. जर कर्जफेड ३६ हप्त्यांमध्ये पूर्ण केली तर घेतलेल्या कर्जावर २ टक्के व्याज आकारले जाते. हे व्याजसुद्धा जास्तीत जास्त दोन हप्त्यांमध्ये होणे आवश्यक आहे. एका कर्जाची परतफेड केल्यावर दुसरे कर्ज त्याच अटीवर घेता येते.
*  खंडित खाते : जर खातेदाराने एखाद्या आर्थिक वर्षांत किमान ५०० रुपये भरले नाही तर ते खाते खंडित होते. असे खाते रक्कम न भरलेल्या प्रत्येक वर्षांसाठीची गुंतवणूक व रु. ५० एवढा दंड भरून पुन्हा सुरू करता येते.
*  स्थानांतरण : हे खाते बँकेतून पोस्ट ऑफिसात किंवा पोस्ट ऑफिसमधून बँकेत तसेच एका गावातून देशभरातील दुसऱ्या कोणत्याही गावात बदलून घेता येते.
अशा प्रकारे प्राप्तिकराच्या दृष्टिकोनातून, तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीने सार्वजनिक भविष्य निधी खाते उघडणे फार उपयोगी आहे. निवृत्तीसमयीही ते फायद्याचे ठरते.

No comments: